Drip Irrigation Technology for Pigeon pea and Cotton Crops शेतकरी मित्रांनो, पारंपरिक शेती पद्धतीमध्ये तूर व कपाशी पिकांना मोकाट किंवा सरी पद्धतीने सिंचन केले जात होते. बदलत्या काळात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत गेला. विदर्भ, मराठवाडा तसेच खान्देश मधील काही भागात तूर-कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्या जाते. यामध्ये प्रामुख्याने जर ठिबक सिंचन तंत्राचा वापर केल्यास उत्पादनामध्ये ३० ते ४० टक्के वाढ दिसून येते. तसेच उत्पादन खर्चात देखील मोठ्या प्रमाणावर बचत होते. अलीकडे सूक्ष्म सिंचन हे तंत्र शेतीसाठी वरदान ठरले आहे.चला तर मग या तंत्राविषयी अधिकची माहिती घेऊया.
तूर हे आपल्या राज्यातील प्रमुख नगदी कडधान्य पिक आहे. राज्यात तूर पिकाखाली ११.४१ लाख हे. क्षेत्र असून उत्पादकता ९.०६ क्विंटल प्रति हेक्टर आहे. आपल्या देशात डाळवर्गीय पिकाचे उत्पादन २० ते २२ दशलक्ष टन असूनसुद्धा २ ते ३ दशलक्ष टन डाळी आपण आपली घरगुती गरज भागविण्यासाठी आयात करत आहोत. याचे प्रमुख कारण म्हणजे आपले डाळीचे मुख्यत: तुरीचे एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पन्न होय.
![]() |
| Drip Irrigation Technology for Pigeon pea and Cotton Crops |
आपली डाळीची वाढती गरज जर भागवायची असेल तर एकरी तुरीची उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. तूर हे पिक पाण्यासाठी अत्यंत संवेदनशील असून जमिनीत ओलावा कमी झाला आणि फुले लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास तुरीची मोठ्या प्रमाणावर फुलगळ होते. म्हणजे तुरीला गरजेनुसार, पिकाच्या वाढीव अवस्थेनुसार, हवे तेवढे पाणी देणे गरजेचे आहे. हे केवळ ठिबक सिंचन तंत्रामुळेच शक्य आहे.
तूर लागवडीचे तंत्र:
- तूर हे प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, ज्वारी इ. पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेतले जाते.
- अशा परिस्थितीत सध्या विविध फायदे असलेल्या ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून सलग तूर पिक घेतल्यास उत्पादनात भरीव वाढ होते. 'Drip Irrigation Technology for Pigeon pea and Cotton Crops'
- ठिबकमुळे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते. पाणी जरी भरपूर असले तरी विजेच्या भारनियमनामुळे दिवसा सिंचन शक्य होत नाही.
- रात्री ठिबक सिंचन पद्धतीने कमी वेळेत अधिक क्षेत्राला एकसमान पाणी देणे शक्य होते.
- पूर्व हंगामी कापसाप्रमाणेच ठिबक सिंचन पद्धतीवर तूर पिकाची लागवड २५ मे पासून १५ जुलै पर्यंत करता येते. तुरीच्या उत्तम संकरीत व सुधारीत जाती बाजारात उपलब्ध आहेत.
याचबरोबर कापूस हे महाराष्ट्रातील नगदी पिकांपैकी प्रमुख नगदी पिक आहे. देशात कापूस पिकाचे १२२ लाख हेक्टर क्षेत्र असून महाराष्ट्रात ४१.४० लाख हेक्टर क्षेत्र असून राज्याची उत्पादकता ३५६ कि. रुई /हे. एवढी आहे. महाराष्ट्रातील उत्पादकता कमी असण्याच्या प्रमुख कारणांमध्ये सिंचनाचा अभाव, असंतुलित पोषण, अयोग्य वेळ व हलक्या जमिनीत केलेली लागवड ही आहेत. राज्यातील एकूण कापूस लागवडीच्या क्षेत्रपैकी फक्त ५ टक्के क्षेत्र बागायती कपाशीखाली असून उर्वरित ९५ टक्के कोरडवाहू पिक घेतले जाते.
पूर्व हंगामी कपाशी लागवड पद्धती:
- साधारणपणे उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये विहिरीत खूपच कमी पाणी असते, अशावेळी पूर्व हंगामी कापसाची लागवड मोकाट सिंचन पद्धतीने करणे शक्य होत नाही.
- कापसाचे विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी पूर्व हंगामी लागवड करणे गरजेचे असते.
- एक तासामध्ये ५ अश्वशक्तीचा पंप सर्वसाधारणपणे ताशी १८००० ते २२००० लीटर पाणी देतो. एवढ्या पाण्यात कमीत कमी ३ ते ४ एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन पद्धतीने २० ते ३० मे दरम्यान उन्हाळी कापूस लागवड करणे शक्य आहे. Drip Irrigation Technology for Pigeon pea and Cotton Crops
- शेतकरी संकरित कापूस लागवडीमध्ये एकरी ४००० ते ५००० झाडे ठेवतात. प्रति झाड पहिल्या ३० दिवसांपर्यंत (मे महिन्यातसुद्धा) केवळ १ ते १.२५ लीटर पाणी लागते.
- पूर्व हंगामी कपाशी पिक हे ठिबक सिंचन पद्धतीवर लागवड केल्याने कापसाची मुळे अधिक खोल जाऊन पिकांची वाढ जोमाने होते आणि पिक लवकर फुलावर येते व वेचणीस तयार होते.
ठिबक सिंचन संचाची उभारणी:
- पूर्व मशागत झाल्यानंतर ठिबक सिंचनासाठी शेताचा आराखडा तयार करावा. आराखड्यानुसार ठिबक सिंचन संचाची उभारणी करून घ्यावी.
- ठिबक सिंचन संचाची निवड करतांना तडजोड करू नये. पाण्याचा स्त्रोत आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी.
- कापूस पिकासाठी इनलाईन ठिबक पद्धतीचा अवलंब करावा. इनलाईन नळी साधारणपणे १२, १६ आणि २० मि.मी. मध्ये असते.
- इनलाईन नळीमध्ये ड्रीपर हे आत बसवलेले असतात. दोन ड्रीपरमधील अंतर हे जमिनीच्या प्रकारानुसार ठरवावे.
- कापूस पिकासाठी मध्यम प्रकारच्या जमिनीकरिता दोन ड्रीपरमधील अंतर ४० ते ६० से.मी. आणि ड्रीपरचा प्रवाह ४ लीटर प्रति तास असलेली १२ मि.मी. किंवा १६ मि.मी. इनलाईन नळीची निवड करावी.
- लोड शेडिंगच्या ज्वलंत प्रश्नामध्ये कमी प्रवाहाच्या ड्रीपरपेक्षा अधिक प्रवाहाचे ड्रीपर जास्त उपयुक्त ठरतात. उन्हाळ्यात बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असते. अशावेळी कमी प्रवाहाचे ड्रिपर्स फायदेशीर ठरत नाहीत.
- या पद्धतीमुळे उत्पादनात दुपटीने वाढ होते.
- पाणी वापरामध्ये ६० % पर्यंत बचत होते.
- कमी पाण्यात, कमी वेळेत, कमी विजेत अधिक क्षेत्रातील पिकास सिंचन करता येते.
- ठिबक सिंचन पद्धतीच्या वापरामुळे खते व पाण्याचा पुरेपूर उपयोग होतो व दर्जेदार कापसाचे उत्पादन मिळते.
- या पद्धतीमुळे जमिनीत कायम वाफसा राहत असल्याने पात्या, फुले, बोंडाची गळ होत नाही, बोंडे चांगली पोसली जातात.
- खते देण्यासाठी, निंदणी करण्यासाठी, सिंचानासाठी लागणाऱ्या मजुरी खर्चात बचत होते.
- ठिबक सिंचन पद्धतीमधून विद्राव्य खतांचा वापर करता येतो.
- कापूस वेचणीस लवकर सुरुवात होते.
|
लागवडीचे अंतर (फूट) |
एकरी झाडे |
ठिबकच्या दोन नळीतील अंतर (फूट) |
दोन ड्रीपरमधील अंतर (सेमी) |
|
४ × २ |
५४४५ |
४ |
६० |
|
४.५ × २ |
४८४० |
४.५ |
६० |
|
५ × २ |
४३५६ |
५ |
६० |
|
५ × १.२५ |
६९६९ |
५ |
४० |
|
५ × १.५० |
५८०६ |
५ |
५० |
टीप: जमिनीचा प्रकार, जातीचे गुणधर्म या बाबींचा
विचार करून अंतराची निवड करावी. एकरी झाडांची संख्या ४००० पेक्षा कमी असू देऊ नये.
- निवड केलेल्या अंतरावर उदा. ५ × १.५० फूट ठिबक सिंचनाची इनलाईन नळी सरळ पसरावी व कापसाची लागवड करतांना कुजलेल्या शेणखताचा वापर जरूर करावा.
- पूर्व हंगामी कापसाची लागवड करण्यापूर्वी संच कमीत कमी १५ २० मिनिटे चालू करावा जेणेकरून १ ते १.५ ली. पाणी पडेल व ज्या ठिकाणी ड्रीपरचे पाणी पडले त्या ठिकाणी बियाणे २ ते ३ सेमी खोल टोकावे. जमीन नेहमी वाफसा अवस्थेत ठेवावी.
- पाण्याची आणि खतांची उपयोगिता वाढविण्याकरिता विद्राव्य खतांचा वापर ठिबक सिंचन मधून करणे अधिक फायद्याचे ठरते. या तंत्रज्ञानास फर्टीगेशन तंत्रज्ञान संबोधले जाते.
- कापूस लागवडीवेळी बेसल डोस १०:२६:२६ – २५ किलो/एकर, झिंक सल्फेट ५ किलो, फेरस सल्फेट ५ किलो, बोरॅक्स २ किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट १५ किलो एकरी एकत्र मिसळून लागवडी वेळी कापूस बियाणे पासून ४ इंच दूर रिंग करून द्यावे.
- खाते मातीने व्यवस्थित झाकावे. सूक्ष्म अन्नद्रव्ये दुय्यम अन्नघटक गांडूळ खत, निंबोळी पेंड अथवा शेणखतामध्ये मिसळून वापरावी.
- विद्राव्य खते ठिबक सिंचन पद्धतीमधून व्हेन्चुरी किंवा फर्टीलायझर टॅंक किंवा न्युट्रीकेअर पंपाद्वारे द्यावे.
|
खत देण्याचा
कालावधी |
खताची ग्रेड
(किलो/एकर) |
खताची एकूण मात्रा |
दर चौथ्या दिवशी
खते देण्याची मात्रा (किलो/एकर/दिवस) |
|
लागवडीनंतर ७ ते २२ दिवस |
१२:६१:० युरिया |
८.३३ १०.०० |
१.६६५ १.९९८ |
|
२३ ते ६० दिवस |
युरिया १२:६१:० पांढरा पोटॅश |
४०.७२ २६.२२ १०.३६ |
३.३०० २.१२४ ०.८४० |
|
६१ ते १०० दिवस |
युरिया १२:६१:० पांढरा पोटॅश |
४५.०० १२.०० १३.३६ |
३.३७५ ०.९०० १.००२ |
|
१०१ ते १२५ दिवस |
पांढरा पोटॅश युरिया |
१९.७० २०.०० |
२.३६४ २.४०० |
|
लागवड ५ × १.५० फूट |
|
|
महिना |
पाण्याची गरज
(झाड/दिवस/लीटर) |
|
मे (लागवड) |
१.१५० |
|
जून |
१.६०० |
|
जुलै |
२.२२५ |
|
ऑगस्ट |
३.६०० |
|
सप्टेंबर |
५.५०० |
|
ऑक्टोबर |
७.१०० |
|
नोव्हेंबर |
४.७५० |
|
डिसेंबर |
३.२६० |
|
जानेवारी |
३.३२५ |
|
फेब्रुवारी |
३.६२५ |
- सुरुवातीला वाढीच्या अवस्थेत १९:१९:१९ तसेच फुले येताना अथवा बोंडे वाढीच्या अवस्थेत ०:५२:३४ आणि बोंडाची पक्वता होण्याच्या अवस्थेत १३:०:४५ ह्या विद्राव्य खतांच्या २-२ फवारण्या कराव्यात.
- विद्राव्य खतांच्या फवारणीत कापूस पिकाची उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. फुले व पात्या यांची गळ होऊ नये म्हणून एन.ए.ए. संजीवकाची ४ ते ५ मिली, १५ लीटर पाण्यातून फवारणी करावी.
- पिक ८० ते ८५ दिवसाचे असतांना ज्यादा कायिक वाढ झाली असल्यास लिहोसीन १० ते १२ मिली, १०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
- उत्पादन- पूर्व हंगामी कापसाची ठिबक सिंचन पद्धतीवर लागवड करून योग्य काळजी घेतल्यास हेक्टरी ४० ते ५० क्विंटल उत्पादन सहज मिळू शकते असा बऱ्याच बळीराजांचा अनुभव आहे.

No comments:
Post a Comment